Wednesday, December 14, 2016

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती




चांदवड हे निसर्गाची अलौकीक देणगी लाभलेले, डोंगरांच्या कुशीत वसलेले गांव. गावामध्ये अनेक ऐतिहासीक वास्तु, मंदिरे आहेत. त्यातलेच एक इच्छापूर्ता गणेश मंदिर.

         गावापासून दिड की. मी. अंतरावर (वडबारेकडे जातांना), रेणूका देवी मंदिराजवळ इच्छापूर्ता गणेशाचे भव्य मंदिर आहे. मंदिराची स्थापना होळकर काळात झाली. सांगितलेजाते, 'बीडचे मूळ रहीवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी १७३० मध्ये ठेवले. तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरु केली. असाच एकदा डोंगरात फेरफटका मारतांना त्यांना बारीत स्वयंभू गणेशमुर्ति प्राप्त झाली. त्यांनी मुर्तीची स्थापना केली' त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला गणेशबारी असे म्हटले जाते. (संदर्भ - जनस्थान-१९३५- वि. का. राजवाडे)
       

     जुन्या मंदिराचा १९७१-७२ मध्ये जीर्णोद्धार करून इच्छापूर्ति गणेश मंदिर ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. आजचे मंदिर संपूर्ण नविन स्वरूपाचे दिसते. मुर्तिचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुर्ति दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर व सुलभ अशी आहे. मुर्तिचं रूप अतिशय लोभनीय आहे.
        मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. आजुबाजुला सर्वत्र बगीचा आहे. मंदिर मुळातच डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. मंदिराच्या कोणत्याही दिशेला बघितले तर सुंदर अशा डोंगरांचे दृश्य दिसते. पावसाळ्यातील वातावरण तर मन थक्क करून सोडते.
 
      मंदिरात गणेश जयंतीला (माघ शु. ४) मोठा भंडारा असतो. त्याचप्रमाणे दर संकष्टी चतुर्थीला श्रींचा अभिषेख होतो. यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
       
आज मंदिर सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. मंदिरात भाविकांसाठी बसण्याची खास व्यवस्था आहे. तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे हा एक उत्तम पिकनिक स्पॉट बनला आहे.




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.